सांगली - कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बेदाणे सौदे शेतकऱ्यांनी बंद पाडले आहेत. 100 ते 130 इतक्या कमी दराने बेदाण्याची विक्री सुरू असल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजका कोरे व जिल्हा परिषद सदस्य तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सौदे उधळून लावत ठिय्या आंदोलन केले.
बेदाण्याला कमी दर, शेतकरी संतप्त
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपला द्राक्षमाल हा बेदाणा निर्मितीकडे वळवला आहे. बेदाणा निर्मितीतून दोन पैसे चांगले मिळतील, अशी अपेक्षा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार पडणाऱ्या बेदाणा सौद्यांमध्ये अत्यंत कमी दराने बेदाणा विक्री व्यापाऱ्यांकडून सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. 200 ते 190 रुपये दराच्या बेदाण्याला 100 ते 130 रुपये दर मिळत असल्याने संतप्त झालेल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू असलेले बेदाणे सौदे बंद पाडले आहेत.
ठिय्या आंदोलन
सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे व जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन बेदाणे सौदे उधळून लावले. बेदाण्याला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी आंदोलनास्थळी धाव घेऊन मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करत बेदाण्याला योग्य भाव मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.