सांगली - पाण्यासाठी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आज आंदोलन केले. तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जत तालुक्याती डफळापूर येथे शेतकऱयांनी रास्तारोको आंदोलन केले. पाण्याचे पैसे भरूनही पाणी मिळत नसल्याने संतप्त शेतकऱयांनी हे पाऊल उचलले. यामुळे जत-सांगली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातील शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे सध्या पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, हा पाणी पुरवठा तोकडा पडत आहे. या तालुक्याला वरदान असणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेतून काही भागातील तलाव भरून घेण्यात आले आहेत. मिरवाड ठिकाणचे तलाव भरून घेण्यासाठी ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाकडे डीडी द्वारे पैसे भरले होते. मात्र, अद्याप हा तलाव भरून देण्यात आलेला नाही. देवानाळ कालव्यातून मिरवाड तलाव भरून देण्याची मागणी आहे. मात्र, पाटबंधारे कार्यालयाकडून पाणी देण्याची पूर्तता होऊ न शकल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी डफळापूर येथे आंदोलन केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व कॉम्रेड हणमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱयांनी बैलगाडी, शेळ्या-मेंढ्या घेऊन रस्त्यावर ठिय्या मारला. पाणी आमच्या हक्काचे, अशी जोरदार घोषणाबाजी करत तब्बल २ तास रस्तारोखुन धरला होता. अखेर पाटबंधारे विभागाने मिरवाड तलावात पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला.