सांगली - केंद्र सरकारकडून २७ कीडनाशकांवर घालण्यात येत असलेल्या बंदीवर शेतकरी संघटनेने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. हा निर्णय म्हणजे शेती बुडवण्याचा उद्योग असून यामुळे करोडो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील, अशी भीती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. गेल्या ४० वर्षात याच कीडनाशकांवर शेतकऱ्यांनी देशाला अन्न-धान्यात सक्षम केले आहे. त्यामुळे हा शेतकरी विरोधी निर्णय असून शेतीत काय वापरायचे ते शेतकऱ्यांना ठरवण्याचा अधिकार आहे, असे मत रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले, ते सांगलीमध्ये 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते.
केंद्र सरकारच्या वतीने शेतीसाठी वापरण्यात येत असलेल्या २७ कीडनाशक, तणनाशक औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तर याबाबत ४५ दिवसात सरकारने मते मागवली आहेत. मात्र, सरकारच्या या निर्णयावर शेतकरी संघटनेने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे शेतकरी विरोधी निर्णय असल्याचा आरोप शेतकरी अंघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला. आजपर्यंत आलेल्या सरकारांनी नेहमीच शेतकरी विरोधी धोरणे राबवली आहेत. नरेंद्र मोदींचे सरकारसुद्धा शेतकरी विरोधी असल्याचे स्प्ष्ट झाले आहे. किंबहुना नरेंद्र मोदी यांना शेतीचे काही कळत नाही, अशीच स्थिती आहे. पर्यावरणाच्या नावाखाली कीडनाशकांवर बंदी घालण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, गेल्या ४० वर्षात याच कीडनाशक, बुरशीनाशक, तणनाशकांच्या जोरावर शेतकऱ्यांनी देश अन्न-धान्य निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण केला आहे.
देशाची ३५ कोटी लोकसंख्या असताना सरकारला देशातील जनतेचे पोट भरण्यासाठी परदेशातून अन्नधान्याची आयात करावी लागत होती. आता मात्र १३५ कोटी लोकसंख्या असताना देशातील जनतेचे पोट भरून निर्यात होईल एवढे अन्न-धान्य उत्पादन होत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा 'थर्ड क्लास डिग्री'च्या असताना शेतकऱ्यांनी मात्र 'फस्ट क्लास' उत्पादन घेतले आहे. आता देशात तयार होत असलेले जेनेरिक कीडनाशक औषधे यांचा चांगल्या पद्धतीने वापर होत असताना, शिवाय परदेशात याला मागणी वाढलेली असताना, काही देशांनी याला बंदी घातल्याने त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या देशातील जेनेरिक कीडनाशकांवर बंदी घालणे हे न समजण्यासारखे आहे. समजत नाही या सरकारला शेतीतील काही कळते कि, नाही, असा प्रश्न पडल्याचे पाटील यांनी सांगितले.
तसेच आज शेतकऱ्याला बी-बियाणे वापरू देत नाहीत, आता देशातील कीडनाशकर वापरू देणार नाहीत, त्यामुळे आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, आता त्या करोडोमध्ये होतील, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली. कोणती औषधे वापरायची, काय करायचे हे शेतकरी ठरवतील, त्यामुळे जे चांगले असेल तेच वापरतील आणि जे वाईट आहे ते आपोआप बंद होईल. मात्र, सरकारने शेतकऱ्यांनी काय वापरायचे, हे ठरवणे योग्य नाही, हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि सरकारच्या कीडनाशक बंदी विरोधात शेतकरी संघटना आवाज उठवणार असल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.