सांगली - लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादीने सांगलीची जागा घेऊन आपल्याला उमेदवारी द्यावी, आपण निवडणूक लढवून सांगलीची जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसमधील उमेदवारीबाबत असणाऱ्या संभ्रमावस्थेवरून अण्णासाहेब डांगे यांनी ही मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुका जाहीर होऊनही काँग्रेसचा सांगलीचा उमेदवार अद्याप जाहीर होऊ शकलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सांगलीची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. पण काँग्रेसमधील गटबाजीमुळे या ठिकाणी उमेदवार देण्यामध्ये अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, अशी मागणी केली आहे.
माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे आज जाहीर केले आहे. ३ वेळा आपण सांगली लोकसभेची निवडणूक लढवली असून, अत्यंत कमी मताने आपला पराभव झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सांगलीची जागा जर आपल्याकडे घेतली आणि उमेदवारी मला दिली, तर सांगली लोकसभा जागा जिंकू, असा विश्वास माजी मंत्री डांगे यांनी व्यक्त केला आहे. तर डांगे यांच्या मागणीमुळे सांगली लोकसभेच्या राजकारणात रंगत आली आहे.