सांगली - इतकं वर्षे राजकारण करूनही तुम्हाला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही. तुमचे 54 आमदार कमी होऊ नयेत म्हणून शरद पवार वारंवार भाजपची सत्ता येणार नाही, असं सांगत ( Sharad Pawar On BJP ) आहेत. पण शरद पवारांनी भाजपची चिंता करू नये. आपले आमदार फुटू नयेत याची काळजी करावी, असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला ( Gopichand Padalkar Criticized Sharad Pawar ) आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पडळकरांचा पवारांना टोला..
देशातील चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने विजय मिळवलेला आहे. या विजयानंतर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार, असा दावा केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपण आहे तो पर्यंत भाजपची सत्ता येऊ देणार नाही, असे वक्तव्य केल आहे. यावरून भाजपाचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
पवारांनी त्यांच्या आमदारांची चिंता करावी..
पडळकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होऊन इतकी वर्षे झाली आहेत. आणि महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला नाही. पावसात भिजून देखील 54 वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या गेली नाही. या उलट भाजपचे आमदार फुटणार, अशी वारंवार चर्चा केली जाते. मात्र, अद्याप एकही आमदार फुटलेला नाही. पण आता देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपची एकहाती सत्ता येत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या 54 आमदारांपैकी कोणीही फुटू नये म्हणून शरद पवार वारंवार महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार नाही, असं वक्तव्य करत आहेत. पण त्यांनी भाजपची चिंता करू नये. आपल्या पक्षाची चिंता करावी आणि आपले आमदार फुटू नयेत याची काळजी करावी, असा टोला लगावला आहे.