सांगली - थकीत पगाराच्या मागणीसाठी मोबाईल टॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी थेट टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचा पगार थकीत आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी सोमवारी( 13 जानेवारी) शहरातील माधवनगर रोडवरील दुर्गामाता मंदिराजवळ असलेल्या एका टॉवरवर चढून आंदोलन केले.
शहरातील एका खाजगी कंपनीकडे जिल्ह्यातील मोबाईल टॉवरच्या देखभाल व दुरुस्तीसाठी 20हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या 8 महिन्यांपासून वेतन थकीत आहे. संबंधित कंपनीकडून वेतन देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. याविरोधात टॉवरच्या टोकावर चढून चार कर्मचाऱ्यांनी ठिय्या देत घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली होती.
हेही वाचा - कन्नड साखर कारखान्याच्या 850 कामगारांच्या थकीत पगाराचा मार्ग तब्बल १० वर्षांनी मोकळा
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आपल्या मागण्यांवर कायम राहत कर्मचाऱ्यांनी खाली उतरण्यास नकार दिला. त्यामुळे, पोलीस प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली होती. अखेर संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांना पाचारण करण्यात आले. व्यवस्थापकाने 2 महिन्यांचे वेतन तातडीने देण्याचे कबूल केल्यावर कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.