सांगली : (Sangli Boat Race) होड्यांच्या शर्यती दरम्यान कृष्णा नदीच्या पात्रामध्ये (Krishna River) स्पर्धकांची बोट उलटल्याची (competitor boat overturned) घटना घडली आहे. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. शर्यतीची होडी पाण्यात बुडाली आहे. कृष्णेच्या पात्रामध्ये पावसाळ्याच्या निमित्ताने होडयांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यावेळी हा प्रकार घडला आहे.
सांगलीवाडी येथील माजी नगरसेवक दिलीप पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फ्रेंड्स युथ फाऊंडेशन, रणसंग्राम मंडळ, सांगलीवाडी आणि सांगली जिल्हा रोईंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी भव्य होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंचक्रोशीतील अनेक बोट क्लबने सहभाग घेतला होता. कृष्णाकाठावर होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला होता. शर्यत सुरू असताना अचानक पणे एक बोट पलटी झाली,त्यानंतर स्पर्धकांनी पोहत नदीचा काठ गाठला. मात्र यामध्ये होडी पाण्यामध्ये बुडाली. होड्यांच्या शर्यतींचा थरार पाहण्यासाठी कृष्णाकाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. आणि बोट पलटीच्या घटनेमुळे सगळ्यांच्याच काळजाचा थरकाप उडाला होता. मात्र सर्व स्पर्धक पट्टीचे पोहणारे असल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. तर पार पडलेल्या होड्यांच्या शर्यतीमध्ये रॉयल कृष्णा बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीच्या पात्रामध्येच मोठ्या प्रमाणात अश्या प्रकारच्या होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहायला मिळतो..सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये होळीची शर्यती आयोजित करण्याची परंपरा आजही कायम आहे. पावसाळ्यात पाणी ओसरल्यानंतर होड्यांच्या शर्यतीला सुरुवात होते. श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कृष्णेच्या पात्रात होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. सध्या वाढलेली कृष्णा नदीची पाण्याची पातळी ओसरली आहे. त्यामुळे पात्रामध्ये होड्यांच्या शर्यतीला सुरुवात झालेली आहे.