सांगली - शिवप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी काढण्यात येणारी दुर्गामाता दौड यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठानचे निमंत्रक नितीन चौगुले यांनी संबंधित माहिती दिली.
नवरात्रीनिमित्त दरवर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते. देशभक्तीचा इतिहास दौडीच्या माध्यमातून जागवण्याचा प्रयत्न शिवप्रतिष्ठानकडून करण्यात येतो. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी ही दुर्गामाता दौड सांगली शहरांमध्ये आयोजित करण्यात येते. सांगलीतून सुरू झालेली ही दौड संपूर्ण राज्य आणि इतर राज्यात पोहोचली आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने घटस्थापनेला धान्याची लागवड करण्यात येते. तसेच नऊ दिवस विविध शहरांमध्ये ही दौड आयोजित करण्यात येते. भल्या पहाटे निघणाऱ्या दौडमध्ये हजारो धारकरी सहभागी होतात. शहरांमध्ये अनेक ठिकाणी रांगोळी, फुलांचे सडे काढून या दौडीचं स्वागत करण्यात करण्यात येतं.
मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आयोजित करण्यात येणारी दौड रद्द करण्यात आल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे निमंत्रक नितीन चौगुले यांनी दिली आहे.