सांगली - संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षावर इस्लामपूर पोलीस ठाण्यासह शहर पोलिसांत पाच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सुयोग औंधकर याला तडीपार करण्यात आले आहे. कासेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यानी प्रांतअधिकारी वाळवा यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६(अ),(१) अन्वये हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तो मान्य झाल्याने संबंधित कारवाई करण्यात आली आहे.
सुयोग गजानन औंधकर याच्यावर गर्दी जमवणे, मारामारी करणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत. विश्रामबाग पोलीस ठाणे येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
कार्यालय तसेच सांगली येथे सरकारी कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणणे या गुन्ह्यांची नोंद आहे.
इस्लामपूर येथील सहा.निबंधक, सहकारी संस्था, इस्लामपूर तालुका कृषी अधिकारी, वाळवा, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे खंडणीची मागणी औंधकर याने केली होती. त्यामुळे आता सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी त्याला हद्दपार करण्यााच प्रस्ताव पोलिसांनी दिला होता. याबाबत कासेगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी उपविभागीय दंडाधिकारी, वाळवा यांचेकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६(अ),(१) अन्वये हद्दपार प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सुनावणी होऊन संबंधित चार जिल्ह्यांमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण सांगली जिल्ह्यात दोन वर्षांसाठी औंधकर यास हद्दपार केले आहे.
असा अंतिम आदेश प्रांत अधिकारी नागेश पाटील यांनी दिल्याची माहिती कासेगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. तर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 28 डिसेंबरपासून करण्यात आली असून औंधकर याने सांगली जिल्हा हद्दीत प्रवेश केल्यास त्याबाबत तात्काळ कासेगांव पोलीस ठाण्यास कळवण्याची विनंती कासेगाव पोलिसांनी केली आहे.