सांगली - मच्छिमारांसाठी लवकरच राज्य सरकारकडून नवीन धोरण यंदाच्या अधिवेशनात मांडले जाणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे. ते मच्छिमारांना जिल्हा नियोजन आराखडा समितीमधून मंजूर झालेल्या साहित्य वाटप प्रसंगी सांगलीमध्ये बोलत होते.
लवकरच मच्छिमारांसाठी नवीन धोरण
सांगली जिल्ह्यात गेल्यावर्षी आलेल्या महापुरामुळे मच्छिमारांच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या हरिपूर -सांगली ग्रुप भोईराज मच्छ्मािर सहकारी सोसायटीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे सांगली जिल्ह्यातील मच्छ्मिारांसाठी मदतीची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा निजोजन आराखड्यातून 74 मासे पकडण्याच्या जाळ्या आणि 1 लाख रुपयांचा विमा देण्यात आला. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते सांगलीमध्ये हा साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना मंत्री कदम म्हणाले की महापुरात मच्छिमारांचे झालेले नुकसान पाहता, शासनाकडून ही मदत देण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर मच्छिमार बांधवांच्या अडचणी लक्षात घेऊन मच्छिमारांसाठी नवे धोरण तयार केले जाईल.