सांगली - पाण्याचा अपव्यय टाळत, एकमेकांचे चेहरे रंगवत आणि रांगोळी व चित्रे काढून सांगलीत बालचमूंनी रंगपंचमीचा आनंद लुटला आहे.
राज्यभरात आज रंगपंचमी मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे. सांगलीमध्ये रंगपंचमीनिमित्ताने ठिकठिकाणी तरूणांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी हुल्लडबाजीचे प्रकार पाहायला मिळतात. तर या रंगपंचमीच्या निमित्ताने पाण्याचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सांगलीतील यशतेज फाउंडेशनकडून दरवर्षी रंगपंचमीच्या निमित्ताने पाणी वाचवा संदेश देण्यात येतो.
यंदाही पाणी वाचवा संदेश देत अनोखी आणि आगळीवेगळी रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे. रंगपंचमीनिमित्ताने फाऊंडेशनकडून रांगोळी, चित्रकला आणि चेहरे रंगवणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये शेकडो मुलांनी सहभाग घेतला. शहरातल्या १०० फुटी याठिकाणी असणाऱ्या साई मंदिरांमध्ये ही आगळी-वेगळी रंगपंचमी साजरी झाली. यामध्ये मुलांनी पाणी वाचवा, निसर्ग वाचवा हा संदेश देणाऱ्या रांगोळ्या व चित्रे काढली. त्याचबरोबर एकमेकांचे चेहरे विविध रंगानी अगदी शांतपणे रंगवत एकमेकांना रंग लावण्याचा आनंद लुटला.