सांगली - कृष्णा नदीला आलेल्या महापुरात आता मगरींचे दर्शन होऊ लागले आहे. वाळवा येथील लक्ष्मी मंदिरानजीक आणि सांगलीनजीकच्या कर्नाळ याठिकाणी रस्त्यावर आणि पुराच्या पाण्यात अजस्त्र मगरींचा वावर दिसून आला आहे. त्यामुळे कृष्णाकाठी महापुराच्याबरोबर मगरींची धास्ती निर्माण झाली आहे.
नदीतील मगरी रस्त्यावर -
सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठी महापुराची स्थिती कायम आहे. आता नागरिकांना मगरीची धास्ती निर्माण झाली आहे. कृष्णा नदीपात्रामध्ये मगरींचे मोठे वास्तव आहे. आता या मगरी महापुरामुळे रस्त्यावर येताना पाहायला मिळता आहेत. वाळवायेथील लक्ष्मी मंदिर या ठिकाणी एक अजस्त्र मगर पहायला मिळाली आहे. ही मगर 9 ते 10 फूट लांब होती. काही तरूणांनी यावेळी व्हिडीओ सुरू केल्यानंतर मगरींने नदी पात्रात प्रवेश केला.
पुराच्या पाण्याबरोबर मगरीही रस्त्यावर -
सांगलीनजीक असणाऱ्या कर्नाळा या ठिकाणी आलेल्या पुराच्या पाण्यात एक मगर दिसून आली आहे. कृष्णा नदीतील ही मगर पुराच्या पाण्यामुळे गावानजीक वावरत असल्याचा पाहायला मिळाली आहे. त्यामुळे एका बाजूला पुराची धास्ती आणि दुसऱ्या बाजूला नदीकाठी होणारे मगरींचे दर्शन यामुळे कृष्णाकाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.