सांगली - मिरजमध्ये संचारबंदी लागू असताना देखील नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड उडाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दीला पांगवले. तर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना चोप देऊन उठाबशा काढायला लावल्या. तसेच होम क्वारंटाईनचा नियम न पाळणाऱ्या एका महिलेला सक्तीने प्रशासनाने क्वारंटाईनसाठी रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा... पालिकेचे यश; कस्तुरबा रुग्णालयातील कोरोनाचे १२ रुग्ण झाले बरे
कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधकात्मक उपाय म्हणून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, या संचारबंदीतही नागरिक अन्नधान्य, भाजीपाला खरेदीसाठी मोठया प्रमाणात बाहेर पडतानाचे चित्र आज सकाळी मिरजेत पाहायला मिळाले आहे. मिरजेच्या मार्केट परिसरात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केली होती. गर्दी झालेली पाहून पोलिसांनी व महापालिका प्रशासनाने भाजीपाला विक्री बंद करून सौम्य लाठीमार करत भाजीपाला विक्रेत्यांना व नागरिकांना हाकलून लावले आहे. तसेच रस्त्यावर दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चोप दिला आहे. त्याचबरोबर मास्क न वापरता फिरणाऱ्यांनाही पोलिसांनी चोप देऊन उठाबशा काढायला लावले.
तसेच मिरजेत सोमवारी नेपाळहुन दाखल झालेल्या एका महिलेस होम क्वारंटाईन करणाच्या सूचना दिल्या असताना, ही महिला बाहेर फिरण्याचा वारंवार प्रयत्न करत असल्याने आसपासच्या नागरिकांनी याची तक्रार करताच पालिका प्रशासनाने सदर महिलेस ताब्यात घेऊन सक्तीने प्रशासनाच्या इन्स्टिट्यूटमध्ये क्वारंटाईन केले आहे.