सांगली - जिल्ह्यासाठी एक सुखद बातमी आहे. गेल्या 3 दिवसात सांगली जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. सोमवारी पाठवलेले 4 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्णांचा वाढत असलेला आकडा सध्या थांबला आहे. परदेशातून सांगली जिल्ह्यात सुमारे 1 हजार 378 प्रवासी परतले आहेत. तर, यातील इस्लामपूर येथील चौघांना 23 मार्चला कोरोना लागण झाली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आठवड्याभरात 'त्या' चार रुग्णांच्या कुटुंबातील तब्बल 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याने देशात खळबळ माजली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासन हायअलर्ट होऊन काम करत आहे. यानंतर त्या चौघांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 400 हून अधिक जणांची चौकशी करत यामधील जवळच्या नातेवाईकांना आयसोलेशन, तर काहींना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन तर काही जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तर, इस्लामपूर शहर 29 तारखेपासून पूर्णतः सील करून कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला आहे.
गेल्या 3 दिवसांपासून कोरोना रुग्णांचा वाढत चाललेला आकडा सध्या थांबला आहे. सोमवारी आयसोलेशनमध्ये असणाऱ्या चौघांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये एक व्यक्ती परदेश प्रवास करून आलेली महिला होती. या महिलेला कोणतीही लक्षणे दिसत नव्हती, तर उर्वरित तीन न्युमोनियाचे रुग्ण होते. त्यांनी कोणताही परदेश प्रवास केला नव्हता आणि या चौघांचेही स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे. त्यामुळे तूर्त सांगलीचा कोरोना रुग्णांचा आकडा थांबला असल्याने, भयभीत झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे.