सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच वेगळे ठेवलेल्या (Home Quarantine) परदेशातून परतलेल्या नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. जे प्रवासी घरात वेगळे राहणार नाहीत, त्यांना सक्तीने विलगीकरण कक्षात ठेवले जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिला आहे. अद्याप जिल्ह्यातील कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही. मात्र, प्रशासन सर्व त्या खबरदाऱ्या घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सांगली जिल्ह्यात परदेशातून परतलेल्या प्रवाशांची संख्या ही 118 वर पोहोचली आहे. यापैकी 8 प्रवाशांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले असून सध्या 2 प्रवासी हे विलगीकरण कक्षामध्ये आहेत. त्यांचे स्वॅब नमुने पाठवण्यता आले असून त्यांचे रिपोर्ट लवकरच येतील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यातील कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही. मात्र, प्रशासनाकडून सर्व पातळ्यांवर खबरदारी घेण्यात येत आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिबिरे रद्द.. तरीही हज यात्रेसाठी झेपावणार विमान
त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यात परदेश वारी करून आलेल्या 116 प्रवाशांना त्यांच्याच घरी निरीक्षणाखाली (Home Quarantine) ठेवण्यात आले आहे. त्यांनी निरीक्षण कालावधी पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडू नये. याबाबतची आवश्यक ती खबरदारी स्वत: संबंधित व्यक्तीने आणि त्यांच्या कुटुंबाने घ्यायची आहे. मात्र, अनेक प्रवासी याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे या प्रवाशांचे होम क्वारंटाईन परिणामकारक व्हावे, यासाठी पोलीस विभागाची मदत घेण्यात येत आहे. आणि जे प्रवासी होम क्वारंटाईनच्या परिणामकारक अंमलबजावणीमध्ये कसूर करताना आढळतील त्यांना सक्तीने प्रशासनाने सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा - कोरोनाचा फटका : सांगली एसटीच्या २ दिवसात ४३२ फेऱ्या रद्द, 22 लाखांचे नूकसान
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवर धार्मिक पूजा आणि विधीवत कार्यक्रम करण्यासाठी कोणतीही बंदी नाही. परंतू भाविकांची गर्दी होणार नाही याची आणि स्वच्छतेबाबतची आवश्यक ती खबरदारी संबंधित ट्रस्टी, संयोजकांनी घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जनावरांचे आठवडा बाजार 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोणत्याही औद्योगीक आस्थापनांवर बंदी नसल्याचेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.