सांगली - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा सर्वाधिक फटका हा कृषी क्षेत्राला बसताना दिसत आहे. शेतीतील तयार मालाच्या विक्रीला मोठी अडचण निर्माण झाली आहे. पीकाची तोडणी, विक्री आणि दर या विवंचेत अडकलेल्या सांगलीतील एका शेतकऱ्याने तब्बल साडेचार एकर क्षेत्रातील टोमॅटो आणि कोबीचे पीक नष्ट केले आहे.
हेही वाचा... जगभर थैमान घालणारा कोरोना विषाणू पाहिलात का? भारतीय शास्त्रज्ञांनी लावला शोध
सांगलीच्या कुरळप या गावातील शेतकऱ्यावर ही वेळ आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याने वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून पिकवलेला शेतमाल शेतातच उपटून टाकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय रहिलेला नाही. वाळवा तालुक्यातील कुरळप येथील शेतकरी जयसिंग पाटील यांना मजूर मिळत नसल्याने व मार्केट बंद असल्याने, ५ ते ६ लाख रुपये खर्च करून उत्पादित केलेले टोमॅटो आणि कोबी आपल्या शेतातच उपटून टाकले आहे.
टोमॅटो हे पीक लवकर खराब होते, ते जास्त दिवस टिकू शकत नाही. सध्या लॉकडाऊनमुळे मार्केट आणि वाहतूक बंद आहे. 'कोरोना'मुळे मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे शेतात आहे, त्या जागेवरच झाडे उपटून टाकावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.