सांगली - हैदराबादमधील भारत बायोटेक या कंपनीच्या 'को-व्हॅक्सिन' लसीची इस्लामपूरमधील प्रकाश रुग्णालयामध्ये चाचणी सुरू झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या 500 हुन अधिक कर्मचाऱ्यांवर लसीची चाचणी पूर्ण झाली आहे. सकृत दर्शनी कोणताही त्रास झाला नाही. आणखी 500 लसी देण्याची प्रक्रिया युध्द पातळीवर प्रकाश रुग्णालयामध्ये सुरू आहे.
लसीकरण चाचणीसाठी प्रकाश रुग्णालयाची निवड..
कोरोना विरोधात भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड हैदराबाद, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजी पुणे, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून भारतीय बनावटीची लस तयार करण्यात आली आहे. देशभर भारत बायोटेकच्या माध्यमातून या लसीचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. देशातील 26 अग्रगण्य रुग्णालयांची निवड करण्यात आली असून यामध्ये सांगलीच्या इस्लामपूर येथील प्रकाश रुग्णालय आणि संशोधन केंद्राची निवड करण्यात आली आहे. सुमारे 1 हजार लसींचा कोटा प्रकाश रुग्णालयाला देण्यात आला आहे.
500 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आली लस..
शुक्रवारपासून प्रकाश रुग्णालयामध्ये भारत बायोटेकच्या 'को- व्हॅक्सिन' लसीची मोहीम सुरू झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात या लसी देण्यात येत आहेत. शिराळा येथून या लस देण्याच्या प्रकियेची सुरुवात झाली आहे. तसेच प्रकाश रुग्णालयातीलही आरोग्य कर्मचाऱ्यांना या लसी देण्यात येत आहेत. दोन दिवसात 500 लसी देण्यात आल्याची माहिती प्रकाश रुग्णालयाचे संचालक आणि इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दिली आहे. एका आठवड्यात या लसी देऊन त्यांच्या चाचणीचा अहवाल भारत बायोटेकला पाठविण्यात येणार आहे.