सांगली - दोन दिवसांपूर्वी बंद झालेले मार्केट यार्ड येथील हमाली आता पुन्हा सुरू झाली. सांगलीत कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर हमाल बांधवांनी काम बंद केले होते. त्यामुळे अन्न-धान्य सेवेवर परिणाम झाला होता. मात्र, आजपासून नियमाचे पालन करून धान्य व किरणा माल उतरवण्यास सुरुवात झाली आहे.
किराणामाल व अन्नधान्य आणि इतर आवश्यक सेवा मार्केटयार्डमध्ये सुरळीत चालू होत्या. शहरातील विक्रेते या ठिकाणाहून होलसेलमध्ये खरेदी करून आपल्या भागात किरकोळ स्वरूपात विक्री करत होते. मात्र, सांगली शहरात रविवारी एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सोमवारपासून मार्केट यार्डमधील अन्नधान्यांच्या गाड्यातून माल उतरवण्यास हमाल बांधवांनी बंद केले होते. तर हमाली बंद झाल्याने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुरू असलेला अत्यावश्यक सेवेचा व्यापार ठप्प पडण्याचा मार्गावर होता.
बाजार समितीच्या आवारात होणारी गर्दी, नियम पाळले जात नसल्याने सुरक्षिततेच्या कारणावरून सुमारे २०० हमाल बांधवांनी हमाली करणं बंद केलं होतं. त्यामुळे दोन दिवसांपासून या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा माल गाड्यातुन उतरवण्यात आला नव्हता. त्यामुळे व्यापाऱ्यांना अन्नधान्य विकणे अवघड बनले होते. दरम्यान हमालांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी आणि हमाल बांधव यांच्यामध्ये बैठक होऊन, उद्भवणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यात आला. ज्या मध्ये ठरावीक वेळेत हमाली, त्यानंतर विक्री आणि पुन्हा माल उतरवण्याचे काम असे नियोजन करण्यात आले. ज्यामुळे बुधवारपासून पुन्हा मार्केट यार्डातील काम सुरू झाले आहे. मोठ्या प्रमाणात अन्नधान्य व इतर माला गाड्यातुन उतरवण्यास सुरवात झाली.