सांगली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातील विनापरवाना खाद्य व्यवसाय व हातगाडे बंद करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्वत: अतिक्रमण पथकासह रस्त्यावर उतरत बेकायदा खाद्यगृहे आणि हातगाडे यांच्यावर कारवाई केली.
हेही वाचा- कोरोना परिणाम : दुकाने, मॉल बंद झाल्याने ऑनलाईन खरेदीचे वाढले प्रमाण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण आणि मनपा स्टाफच्या मदतीने सांगली शहरातील प्रमुख मार्गावरील विनापरवाना खाद्यगृहे बंद केली आहेत. अत्यावश्यक सेवांची दुकाने आणि भाजीपाला वगळता सर्व खाद्यगृहे तसेच हातगाडे कारवाईत ताब्यात घेण्यात आले.
कोणीही 31 मार्च पर्यंत आपले खाद्यगृहे आणि हातगाडे सुरू करू नयेत. आपल्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले.