सांगली - कर्नाटकातील चिरहट्टी येथे कोळसा भट्टीवर काम करणारे 101 मजूर कर्नाटक प्रशासनाने दखल न घेतल्याने खासगी वाहनाने जत हद्दीतील बसर्गी गावात आले. गुरूवारी मध्यरात्री ते बसर्गीत आल्यानंतर याबाबतची माहिती तहसीलदारांना देण्यात आली. त्यानंतर हे सर्व मजूर रायगड, पाली अहमदनगर येथील असून त्यांना सुखरूप आपल्या गावी पोहोचवले जाणार आहेत.
मजुरांना कर्नाटक सीमेवर आणून सोडल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर आमदार विक्रमसिंह सावंत, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, मंडल अधिकारी संदीप मोरे, व आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचारी याठिकाणी दाखल झाले. स्थानिक पातळीवर या मजुरांना जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौगुले यांना देण्यात आली असून मजूरांना चार एस. टी. बसने आपाआपल्या गावी पाठविण्यात येणार आहे.
तहसीलदार सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले हे कोळसा भट्टीवर काम करणारे मजूर असून मध्यरात्रीच्या सुमारास ते बसर्गी गावात चालत आले. कर्नाटकातून ते एका वाहनाने हद्दीपर्यंत पोहोचले. सर्वांची आरोग्य तपासणी केली असून त्यांना रायगड, पाली, अहमदनगर येथे बसने पाठविण्याची सोय केली आहे. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.