सांगली - मंदिरात चप्पल घालून आल्याच्या वादातून दोन गटात राडा झाला आहे. जिल्ह्यातील आटपाडीमधील मासाळवाडी गावामध्ये ही घटना घडली. यावेळी 2 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. यामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावाचाही समावेश आहे.
मंदिरात चप्पल घालून आल्याने राडा
आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावामध्ये दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. गावातील मंदिरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन दिवसांपूर्वी काहीजण चप्पल घालून आले होते. त्यावेळी मंदिरात चप्पल घालून का आला? यावरुन वादा झाला होता, यातून मंगळवारी गावातील 2 गटात हाणामारी झाली. या राड्यात त्याठिकाणी असणाऱ्या 2 दुचाकींची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आमदार पडळकरांच्या भावाचा समावेश
या हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार आटपाडी पोलिसांच्याकडून दोन्ही गटाच्या 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मदेव पडळकर यांचा समावेश आहे. दरम्यान ब्रह्मदेव पडळकर यांनी या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पाडव्याला उघडण्यात आली मंदिरे
कोरोनामुळे राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली होती. मात्र दिवाळीला पाडव्याच्या मुहूर्तावर ती उघडण्यात आली. काही मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तर काही मंदिरात तुरळक गर्दी दिसून आली. मात्र मंदिरे उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी असा प्रकार सांगली जिल्ह्यात समोर आला आहे.