सांगली - कृष्णा नदीला महापूर आलेला आहे. अवाढव्य बनलेले कृष्णेचे पात्र आणि पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांचा लोंढा आयुर्विन पुलावर धडकत आहे. त्यामुळे याठिकाणाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याचा परिणाम शहरातल्या वाहतुकीवर होत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची दमछाक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुराच्या पाण्याने जवळपास 45 फूट उंची ओलांडली आहे. कृष्णामाईचे आक्राळ-विक्राळ रूप पाहण्यासाठी नागरिकांचे लोंढे कृष्णा नदी काठावर येऊन धडकत आहेत. पुलावर पुराच्या पाण्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे.तर सांगलीहुन पुणे-इस्लामपूरकडे जाणारा बायपास रस्ता पाण्याखाली गेल्याने, या मार्गावरील वाहतूक शहरातील आयर्विन पुलावरून वळविण्यात आली आहे. पुलावरच्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
सांगली पोलीस प्रशासनाकडून पुलावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. टिळक चौक या ठिकाणी शहर वाहतूक विभाग आणि सांगली शहर पोलीस यांच्याकडून बॅरिकेटस लावण्यात आले आहेत. पुलावर जाणाऱ्या नागरिकांना मज्जाव करण्यात येत आहे.