सांगली - बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती गावात 2 दिवसांपूर्वी अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पण तेथील काही स्थानिक लोकांनी आणि तथाकथित प्रादेशिक अस्मिता मिरवणाऱ्या संघटनांनी या प्रतिष्ठापणेला तीव्र विरोध करत, कर्नाटक प्रशासनाने त्यांचीच बाजू घेत रात्री ही मूर्ती चौथऱ्यावरून हटवली. यामुळे चिकुर्डे येथील महाराष्ट्र एकीकरण समिती मंडळाच्यावतीने कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
कर्नाटकी लोकांच्या डोळ्यात आमचे छत्रपती शिवाजी महाराज का खुपत आहेत. ते हिंदवी स्वराज्य संस्थापक आहेत म्हणून? की मराठा आहेत म्हणून? का मराठी भाषिकांचे आराध्य आहेत म्हणून? की यांना छत्रपती शिवाजी महाराज या नावाची कावीळ झाली म्हणून, असे सवालही महाराष्ट्र एकीकरण समितीचे शहाजी भोसले यांनी केले.
कर्नाटकात भाजपची सत्ता आहे म्हणून, अशा गोष्टींना मुद्दामहून महत्व दिले जात नाही. जर महाराष्ट्रामध्ये घडले असते तर याबाबत मोठे लेख, पोस्ट, तसेच त्याची सीबीआय तपासाची मागणी करत हलकल्लोळ झाला असता. याप्रकरणी सर्व शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन कर्नाटक प्रशासनाने समाजकंटक लोकांवर कायदेशीर कार्यवाही करावी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सन्मानपूर्वक करावी ही मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि शिवभक्तांच्यावतीने करण्यात आली. तर यावेळी कर्नाटक सरकारच्या जाहीर निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते शहाजी राजेभोसले, अमरसिंह शिंदे, प्रकाश पाटील, स्वप्नील पवार, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.