सांगली - वंचित 65 गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी काल 2 हजार कोटी रुपये देण्याची केलेली घोषणा दिशाभूल करणारी असल्याची टीका भाजपच्या माजी आमदारांनी ( Former BJP MLA Vilasrao Jagtap ) केली आहे. जानेवारीत काम सुरू करू असे दिलेले आश्वासन हे धादांत खोटे असून मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे ( Chief Minister statement is misleading ) असल्याचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे - विलासराव जगताप म्हणाले, काल सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक म्हैसाळ योजनेसाठी नव्हतीच. जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असणाऱ्या कामांना गती देण्यासाठी होती. या कामासाठी 2 हजार कोटी रुपये त्यांनी दिले आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु विस्तारित योजनेबाबत केलेले वक्तव्य साफ खोटे, दिशाभूल करणारे आहे. कारण या योजनेला अद्याप कसलीही तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी, त्याचे बजेट अजूनही कॅबिनेट समोर आलेले नाही. शिवाय कालच्या बैठकीला ज्यांच्याकडे जलसंपदा विभागाचे खाते आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. जलसंपदा खात्याचे सचिव, अधिकारी देखील उपस्थित नव्हते असे ते म्हणाले.
जत म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी स्वतंत्र बैठक - कर्नाटकने जतवर केलेल्या दाव्यानंतर येथील जनतेचा संभ्रम दूर व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी कदाचित हे वक्तव्य केले असावे. जोपर्यंत विस्तारित योजनेसाठी चांगला निर्णय होत नाही, तोवर आम्ही विश्वास ठेवणार नाही. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने जत म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी स्वतंत्र बैठक घ्यावी. या बैठकीला तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पाणी योजनांचे अभ्यासक अशा सर्वांना बोलावून ठोस कृतिशील कार्यक्रम जाहीर करावा अशी आमची मागणी असल्याचे जगताप म्हणाले.