सांगली - राज्यात महिलांवर अत्याचार वाढले असून, कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांनी केले. भाजप सरकारने घेतलेले लोकोपयोगी निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून रद्द करण्यात येत आहेत. मात्र, हे निर्णय रद्द करून नवीन काही केल्याचे दिसत नसल्याचे पाटील म्हणाले. तसेच जेवढ्या चौकशा लावायच्या तेवढ्या लावा, आम्ही घाबरत नसल्याचेही पाटील म्हणाले.
सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. भाजप सरकारने घेतलेले लोकोपयोगी निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून रद्द करण्यात येत आहेत. तसेच या सरकारने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी आहे. विहीर, शेडनेट कर्जाचे काय? असा सवाल करत या सरकारने जनादेशाचा अनादर केल्याचेही पाटील म्हणाले.
भाजप शिवसेना भाऊ, भांडण करुन वेगळे राहिले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्या भेटीवर बोलताना पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केले. भाजपा-शिवसेना हे दोन भाऊ असून भांडण करून वेगळे राहू लागले तरी नाते राहतेच. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आत्मविश्वास वाढत आहे. ३ महिने दचकत निर्णय घेणारे मुख्यमंत्री ठाकरे आता हळू हळू आपला निर्णय घेऊ लागले आहेत. त्यामुळे आता ठाकरे यांचे धाडस वाढत असून, अभिनंदनीय बाब असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
कायदा सुव्यवस्था ढासळली ..!
राज्यात आज महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे या राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप पाटील यांनी केला. वृक्ष लागवड आणि जलयुक्त शिवार योजनेची लावण्यात येणाऱ्या चौकशीवरून सरकारवर पाटील यांनी टीका केली. आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे पाटील म्हणाले. जेवढ्या चौकश्या लावायच्या तेवढ्या लावा, पण निर्णय लवकर द्या, असे पाटील म्हणाले. या सरकारने चौकशीच्या नावाखाली अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक रखडवले असल्याचे पाटील म्हणाले.
काकडेंच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही...
राज्यसभेच्या होणाऱ्या निवडणुकीवरून काकडे यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर पाटील म्हणाले की, काकडेंच्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मत मांडण्याचे सर्वांना अधिकार आहेत. राज्यसभेवर कुणाचे नाव द्यायचे, हे केंद्रात ठरेल. राज्यसभेचे अजून नोटिफिकेशन निघायचे आहे. 8 एप्रिलला मुदत संपायची आहे. केंद्रातून कोणाचे नाव निश्चित होतेय हे पाहू, असे पाटील यावेळी म्हणाले.