सांगली - जिल्ह्यातील महापुराच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. गुरुवारी वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यातील पूरग्रस्त गावाची केंद्रीय पथकाने पाहणी करत पूरग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधत महापुराची आणि नुकसानीची माहिती घेतली आहे.
राज्यात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सहा हजार कोटींची मदतीची मागणी केली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात सांगली-कोल्हापूर-सातारा जिल्ह्यांसाठी 4 हजार 600 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी प्रामुख्याने केंद्र सरकारकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय पथक सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सहसचिव डॉ.व्ही थिरपूगझी यांच्या नेतृत्वाखाली सात जणांचे पथक महापुराच्या नुकसानाची पाहणी करत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी दोन दिवस जिल्ह्यातल्या चार तालुक्यांसह सांगली शहराची पाहणी या पथकाकडून करण्यात येणार आहे. आज गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यातल्या पश्चिम भागातील गावांची पाहणी केली आहे. यावेळी प्रत्यक्ष शेतामध्ये तसेच पुरात पडलेल्या घरात जाऊन पाहणी करुन पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांशी पथकाने संवाद साधला.
पथकामध्ये केंद्रीय कृषी विभागाचे आर. पी .सिंग, वित्त विभागाचे चित्तरंजन दास, ऊर्जा विभागाचे ओम प्रकाश, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे संजय जयस्वाल, ग्रामीण विकास विभागाचे व्ही. पी राजवेदी, जलशक्ती विभागाचे मिलिंद पानपाटील यांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत या पथकाकडून महापुराच्या नुकसानीची पाहणी सुरू होती.