सांगली - मुंबईवरुन ढगेवाडी (ता.वाळवा) येथे आलेल्या तिघांवर सोमवारी (दि.13 एप्रिल) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तोंडाला मास्क नसणाऱ्या व विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर आता गुन्हे नोंद करणार, यासह जिल्हाबंदी असताना जे लोक त्याचे उल्लंघन करतील अशा लोकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे कुरळप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी सांगितले.
यासह संचारबंदी असताना सायकल दुकान, मोबाईल दुकान, येलूर मधील ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही लोकांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
कुरळप पोलीस ठाणे अंतर्गत एकवीस गावे आहेत. कोरोना ग्रामीण भागात पसरु नये म्हणून पोलीस अहोरात्र प्रयत्न करत आहेत. ग्रामीण भागातील बहुतांशी लोक स्वयंशिस्त पाळत आहेत. मात्र, काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरुन शिस्त मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. प्रथम काम नसताना रस्त्यावर फिरणाऱ्यांना काठीचा प्रसाद मिळाला. त्यानंतर पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना विनंती करुन घरी थांबण्यास सांगितले. पोलिसांच्या या कारवाईला न जुमानता लोक आता रस्त्यावर फिरत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलीस रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या व तोंडाला मास्क नसणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करत आहेत.
कुरळप प्राथमिक केंद्रांतर्गत बाहेरुन आलेल्या सात गावांतील १७ नागरिकांवर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. कुरळप, वशी, इटकरे, ऐतवडे खुर्द, ढगेवाडी आदी गावातील हे सतरा जण आहेत. यांच्यावर आरोग्य विभागासह पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहेत.
हेही वाचा - सांगली : वाळवा-शिराळा तालुक्यात गारांसह पाऊस, वीज कोसळल्याने नुकसान