सांगली - मिरज तालुक्यातील बेळंकी येथील पोलीस कुटुंब आत्महत्या प्रकरणी सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील 14 सावकारांच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. कर्जाच्या तगाद्यामुळे निवृत्त पोलीस कर्मचारी गव्हाणे यांच्यासह कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्येची घटना घडली होती.
मुलाच्या कर्जापायी आई-वडीलांचाही बळी
सांगली पोलीस दलातील निवृत्त पोलीस कर्मचारी आण्णासाहेब गव्हाणे यांच्यासह त्यांच्या पत्नी मालती गव्हाणे आणि मुलगा महेश गव्हाणे या तिघांना बेळंकी या ठिकाणी आपल्या राहत्या घरात एकाचं वेळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. महेश गव्हाणे हा इंजिनिअर होता, तसेच शेअर मार्केटचाही त्याचा व्यावसाय होता. त्यासाठी त्याने काही सावकारांच्याकडून कर्ज घेतले होते.
आत्महत्यापूर्वी त्रास देणाऱ्यांच्या नावाची चिठ्ठी
महेश गवाणे याने काही दिवसांपूर्वी त्याला होणाऱ्या त्रासामुळे चिठ्ठी लिहली होती. ती सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ज्यामध्ये आर्थिक गोष्टींचा उल्लेख करत पैश्याच्या वसुलीसाठी तगादा देणाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. तसेच जे लोक त्रास देत आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त असून त्यांच्यावर कारवाई करावी, व्हावी अशी विनंती करत आई व वडील यांची आठवण करून आत्महत्या करण्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यावेळी त्याने आत्महत्या केली नाही. पण, वसूलीचा तगादा वाढल्याने संपूर्ण कुटुंबासह शनिवारी 23 जानेवारीला राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
14 जणां विरोधात गुन्हे दाखल
याघटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्येबाबत नोंद झाली होती. तर गव्हाणे यांच्या घरात सापडलेल्या चिट्ठीवरून पोलिसांनी सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केले आहे. यामध्ये विवेक घाटगे, किरण होसकाटे, राजीव शिंगे (तिघे रा. रायबाग), विनायक बागेवाडी ,संतोष गसुळी (दोघे रा. हारुगीर, जिल्हा - बेळगाव), अमित कुमार कांबळे, प्रवीण बनसोड, पूजा शिंगाडे आणि शैलेंद्र शिंदे (तिघे रा. मिरज), कमलेश कलमाडी (रा. नरवाड, तालुका मिरज), बाळासाहेब माळी (रा. कवठेमहांकाळ), अरुण थोरात ,जितेंद्र पाटील (दोघे रा. सांगली) आणि जुबेर मोकाशी उर्फ मौलाना (रा. - कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर) यांचा समावेश असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरिक्षक मिलिंद पाटील यांनी दिली आहे.