सांगली - मिरज येथील सुभाषनगर येथे एकाच दिवशी आठ घरफोडी झाल्याच्या माहिती पुढे आली आहे. यामध्ये एकूण सुमारे चार लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. या घटनेमुळे सुभाषनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एकाच वेळी आठ घरात चोरी -
रविवारी पहाटेच्या सुमारास आठ बंद घरांमध्ये चोरी झाल्याची घटना घडली. घराचे कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोने-चांदीची दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. ज्या घरांमध्ये चोरीची घटना घडली आहे. तेथील नागरिक हे आपल्या नातेवाईकांच्याकडे गेले होते. त्यामुळे आठही घरांना कुलूप होते. अज्ञात चोरट्यांनी टेहाळणी करून याचा फायदा उठवत लाखोंचा मुद्देमाल लंपास केला.
चार लाखांचा मुद्देमाल लंपास -
यामध्ये सोहेल सय्यद यांच्या घरातून 40 हजार रुपये रोख रक्कम, किराणा दुकानातून 2000 हजार रुपये, सेवा निवृत्त मेजर उमराणीकर यांच्या घरातून सात तोळे सोने, 15 तोळे चांदी, 20 हजार रोख रक्कम, बाळू बारटक्के यांच्या घरातून पूजेची चांदीची भांडी, असा अंदाजे चार लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला आहे. याठिकाणी आठ घरांपैकी चार घरात किरकोळ रकमेची चोरी झाली आहे. या घटनेनंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या चोरीचा तपास सुरू केला आहे.