सांगली- कोरोना विरोधात लढणारे जिल्हा प्रशासन आता पूरपरिस्थितीशी लढण्याची तयार करत आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरात कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पूरपरिस्थितीबाबत नियोजन आढावा बैठक पार पडली. यामध्ये महापुराच्या पार्श्वभूमीवर बोटी तसेच इतर साधन सामुग्री तातडीने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला जिल्ह्यात ९ कोरोना रुग्ण आहेत. आणि कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. असे असताना प्रशासनासमोर आणखी एक संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे. ते म्हणजे महापुराचे संकट. जिल्ह्यात गतवर्षी महा भयंकर असा महापूर आला होता. कृष्णा व वारणा काठासह अर्धा जिल्हा या महापुरात बुडाला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात प्रशासनाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते, तरीही महापुरासमोर प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडली होती. साधन सामुग्रीचा अभाव हे त्यामागचे मुख्य कारण होते.
दरम्यान आता पावसाळा सुरू होणार आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसर्या बाजूला कोयना आणि वारणा धरण आधीच ५० टक्क्यांहून अधिक भरलेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासन संभाव्य पावसाळा आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर सतर्क झालेला आहे. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आज कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा आणि नियोजन बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्त उपस्थित होते. यावेळी बैठकीमध्ये महापुराच्या दृष्टीने योग्य त्या खबरदारी आणि उपाययोजना करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खरेदी करण्यात येणाऱ्या साधनांमध्ये २४ बोटींचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या बोटी खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लाईफ जॅकेट, हेल्मेट, गनबूट अशी अनेक साधने खरेदी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, पतंगराव कदम यांच्या नावाने उभारलेल्या आपात्कालीन निधीतूनही जिल्हा प्रशासनाला बोटी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.
तसेच येत्या महिन्याभरात प्रशासनाकडे ८७ बोटी आणि अन्य साधने उपलब्ध होतील. त्यामुळे, जर यंदा महापूर आला तर त्याला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- गुजरातमधून सांगलीत आलेल्या महिलेला कोरोनाची लागण, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा नऊवर