सांगली - शिवसेनेच्या युवा सेनेच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यासाठी मोबाईल व्हॅन सुरू करण्यात आले आहे. एका दिवसात तब्बल १६० जणांनी रक्तदान केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रक्ताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील शिवसेनेच्या युवा सेनेकडून रक्तदान संकलन मोहीम सुरू करण्यात आली आहे.
संपूर्ण लॉकडाऊन असल्याने अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करायची इच्छा आहे. मात्र, संचारबंदीमुळे बाहेर पडणे अशक्य असल्याने, तसेच ठराविक एका ठिकाणी घेतल्यास गर्दी होण्याची शक्यता असल्याने यावर सांगलीच्या युवा सेनेकडून मार्ग काढण्यात आला आहे. ज्या इच्छुक रक्तदात्यांना रक्तदान करायचा आहे, त्यांच्यापर्यंत थेट जाऊन रक्त संकलनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून रक्त संकलन सुरू करण्यात आले आहे. डॉक्टर शिरगावकर रक्तपेढीच्या माध्यमातून हे ब्लड संकलित करण्यात येत आहे. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली एका दिवसात तब्बल १६० जणांच्या रक्तदान करून घेण्यात आले आहे.