सांगली - आघाडी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज हे फसवे आहे. शिवाय राज्य सरकार गेंड्याच्या कातडीचे असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते सांगलीत बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकारी - कार्यकर्ता बैठक पार पडली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
'जितेंद्र आव्हाड आता आरोपी झालेत'
शिवसेनेला दसऱ्याच्या शुभेच्छा देताना, आघाडी सरकारला मात्र आपण शुभेच्छा देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली. तसेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अटक व सुटकेवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आता जितेंद्र आव्हाड हे आरोपी झाले आहेत. महाराष्ट्राचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर आरोपी झाल्यानंतर मंत्री राजीनामे देतात. मात्र या सरकारमध्ये धनंजय मुंडे, असतील अनिल परब असतील आव्हाड असतील त्यांचा असा समज झाला आहे, की सर्व सामान्यांना वेगळा न्याय आणि आपल्याला वेगळा न्याय आहे. त्यामुळे हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे, अशी टीका पाटील यांनी आघाडी सरकारवर केली आहे.
'पूरग्रस्त पॅकेज तर फसवे'
राज्य सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजबाबत बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले, 10 हजार कोटींचे जाहीर केलेले पॅकेज म्हणजे फसवे आहे. मुळात 2019 चा जीआर प्रमाणे मदत देण्याची सगळ्यांचीच मागणी होती. 2019 मध्ये सरसकट शेतीचे नुकसान भरपाई दिली होती. पण हे सरकार अजून पंचनाम्याचे तुणतुणे वाजवत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने दुप्पट-तिप्पट भरपाई दिली. मात्र आघाडी सरकार दुपटी पेक्षाही कमी मदत देत आहे आणि या दहा हजार कोटीमध्ये रस्ते दुरुस्ती याशिवाय अनेक गोष्टींचा समावेश आहे. मात्र फडणवीस सरकारने फक्त नऊ हजार कोटी पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी दिले होते. त्यामुळे हे सरकारचे पूरग्रस्त पॅकेज फसवे आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.
हेही वाचा - तंत्रज्ञानाचा अतिरेक आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण गरजेचे - सरसंघचालक मोहन भागवत