सांगली - सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बूथ कमिटी पदाधिकाऱ्यांचा आज सांगलीमध्ये संघटना संवाद मेळावा पार पडत आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री सुभाष देशमुख हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली, कोल्हापूर आणि सातारा या ३ जिल्ह्यातील बूथ कमिटी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि संवाद साधण्यासाठी आज सांगली भाजपचा संघटना संवाद मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार होते. मात्र, युद्ध परिस्थितीमुळे त्यांनी जिल्ह्याचा दौरा रद्द केला आहे. दानवे आणि देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडत आहे.
या मेळाव्यातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. शहराबाहेरील कर्नाळ रोडवरील धनंजय गार्डन या ठिकाणी हा मेळावा पार पडणार आहे.