सातारा - मी कुरघोड्या करत नाही, समोरासमोर दोन हात करण्याची माझी तयारी असते. पाठीत खंजीर खुपसत नाही. पण माझ्या वाटेला गेल्यास माझी वाट लागली तरी चालेल, माझे सर्व संपले तरी चालेल पण मी त्याचे सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही," अशा शब्दांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी तालुक्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले.
राजकीय वातावरण ढवळून निघाले
सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील कुडाळ (ता. जावळी) येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. शांत, संयमी म्हणून ओळख असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी अनपेक्षितपणे हा शाब्दिक हल्ला चढविल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
काय म्हणाले शिवेंद्रसिंहराजे?
आपला काटा जर कोणी काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. याबाबतीत मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. जर कोणी आडवेपणा करत असेल, तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही.
उदयनराजेंच्या विरोधात निवडून आलेला माणूस
मी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे, हे विसरू नका. तेव्हा माझी वाट लागली तरी चालेल, पण समोरच्याची मी वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा गर्भीत इशाराही त्यांनी यावेळी दिला.
निवडणुकांची नांदी?
शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे प्रयत्न करत असून त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तोंडावर आहे. त्यानंतर सातारा नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यात राष्ट्रवादीचे पॅनेल घेऊन उतरणार असल्याचे संकेत शशिकांत शिंदे यांनी यापूर्वीच दिले आहेत. या दोन्ही निवडणुका दूर असल्या तरी त्याची नांदी सुरू झाल्याचे चित्र सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. आमदार भोसले यांच्या या शाब्दिक हल्ल्यानंतर आमदार शिंदे कसे प्रत्त्युत्तर देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.