सांगली - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. चार खासदार असणारे जर लोकनेते होत असतील, तर 303 खासदार असणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाला काय म्हणाले पाहिजे? असा सवाल करत त्यांनी पवारांवर टीका केली आहे, ते सांगली मध्ये बोलत होते.
राष्ट्रवादीला महाराष्ट्र म्हणजे आपली जहागीरदारी वाटते-सांगली मध्ये आज पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ मेळावा पार पडला. या मेळाव्यास भाजपा आमदार आणि प्रवक्ते गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी बोलताना शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्र स्वत:ची जहागीर आहे असे वाटते. आम्हाला कोण अडवणार नाही, असा त्यांचा गैरसमज झाला असल्याचा टोला लगावला आहे.
शरद पवार म्हणजे चार खासदारांचे लोकनेते -राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्रातील भाजपा नेतृत्ववर टीका करण्यात येते,मात्र शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 खासदार आहेत, तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना लोकनेते म्हणतात, मग 303 खासदार असणाऱ्या नरेंद्र मोदींना काय म्हणावे, असा खोचक सवाल आमदार पडळकर यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीला केला.
यापूर्वीही शरद पवारांवर केली होती जहरी टीका-
पडळकर यांनी यापूर्वीही शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केले होते. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे माझे मत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत. या काळात राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे, अशा शब्दात पडळकर यांनी पवार यांना लक्ष्य केले.