सांगली - "अब तो स्पष्ट है, ये सरकार भ्रष्ट है " असा नारा देत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तसेच संजय राऊत यांना गृहमंत्री करा, असा टोला लगावत आता गृह मंत्री बदलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - आज-उद्या आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा होईल; चंद्रकांत पाटील यांचा दावा
महाविकास आघाडी सरकारवर टीका
पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रावरून चंद्रकांत पाटलांनी सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांचे नुकतच निधन झाले. त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते सांगलीमध्ये आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी राज्यात गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणानंतर बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
'गृहमंत्री बदलण्याची गरज'
पाटील म्हणाले, की परमवीर सिंग यांनी पत्रातून सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटी वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता आपल्या डोक्यात एक घोषणा आलेली आहे, "अब तो स्पष्ट है, ये सरकार भ्रष्ट है " अशा शब्दात पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच आता बाहेरून कोणी आरोप करण्याची गरज नाही, वारंवार संजय राऊत हे विरोधक खोटे आरोप करत असल्याचे सांगत होते. मात्र आता सगळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांनाच गृह मंत्री करा, असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला आहे.
हेही वाचा - केवळ वाझे वाझेच सुरू आहे, गिरणी कामगारांकडे सुद्धा लक्ष द्या - आमदार पाटील
'राजकीय गुन्हेगारी वाढत आहे'
राज्यात राजकीय गुन्हेगारी वाढत आहे, गुन्हे वाढत आहेत आणि सचिन वाझे प्रकरणावरून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे गृहमंत्री बदलण्याची गरज आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.