सांगली - सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी अशी लढत होत आहे. 7 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे.
सत्ताधारी भाजपकडून महापौर पदासाठी गीता सुतार, तर उपमहापौर पदासाठी आनंदा देवमाने यांनी अर्ज दाखल केले आले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी मालन हुलवान, वर्षा निंबाळकर, तर उपमहापौर पदासाठी योगेंद्र थोरात आणि मनोज सरगर यांचे अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी अशी लढत होत आहे, तर 7 फेब्रुवारीला या पदासाठी निवडणूक पार पडणार आहे.
हेही वाचा - सांगलीच्या आष्टा येथे चक्क स्मशानभूमीत रंगला पारायण सोहळा
सध्या महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्यातच इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे भाजप नगरसेवकांत काहीशी नाराजी आहे. त्यामुळे या नाराजीचा फायदा आम्हाला होईल आणि निवडणुकीत चमत्कार घडेल, असा दावा काँग्रेसने केला आहे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने महापौर, उपमहापौर पदाच्या उमेदवारांची निवड केली आहे. त्यामुळे आमच्यात कोणीही नाराज नसून भाजप एकसंघ आहे. त्यामुळे सांगली महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पुन्हा भाजपचाच होईल, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - सांगलीत कराटेचा विश्वविक्रम, ८३३ कराटेपटूंनी १० मिनिटात मारले 'इतके' लाख पंच
राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तेनंतर अनेक महापालिकेत भाजपला सत्तेपासून दूर जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने सांगलीमध्ये पूर्ण खबरदारी घेतली आहे, तर काँग्रेसकडून चमत्काराचा दावा करण्यात आला आहे. मात्र, कोण बाजी मारणार हे 7 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा - 'कृष्णा नदी' पडली कोरडीठाक; सांडपाण्यामुळे नदीला गटारगंगेचे रूप