सांगली - जिल्ह्यातील वाळवामध्ये बारबिगा वसाहतीत भीषण आग लागल्याने शेतमजुरांची २४ घरे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण आगीत संसाराचे साहित्य जळून खाक झाले आहे. मात्र, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेत सुमारे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. सकाळी १० वाजता गंगूबाई प्रकाशे यांच्या घरी आग लागली. यादरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीने पांडुरंग डांगे, शंकर करांडे , काकासाहेब लोखंडे, दशरथ करांडे, शिवाजी चिखले यांच्या घरातील एका पाठोपाठ एक असे सलग ५ गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. आगीने रौद्र रूप धारण केल्याने या आगीमध्ये एकमेकांना लागून असणारी घरे जळून खाक झाली.
आग लागली त्या दरम्यान घरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने दाखल होऊन आग विझवली. मात्र, या अग्नीतांडवात संसार उपयोगी साहित्य, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, घराचे पत्रे, जळून खाक झाले आहेत.
या घटनेनंतर हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी सर्व कुटुंबांमध्ये ५ हजार रूपयांची मदत जाहिर केली आहे. तहसिलदार रविंद्र सबनीस यांनी घटनास्थळी भेट देऊन लवकरात लवकर शासकीय मदत करू, असे आश्वासन दिले आहे.