सागंली - कोरोनामुळे नोकरी गेल्याने उदरनिर्वाह करण्यासाठी लेखक आणि साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते "फेसाटीकर"नवनाथ गोरे यांच्यावर शेतात मोलमजुरी करण्याची वेळ आली. याबाबत गोरे यांच्या परिस्थितीच्या बातम्याही माध्यमांत आल्या. यानंतर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी त्यांच्या भारती विद्यापीठामध्ये गोरे यांना नोकरी देऊ केली आहे. तसेच गोरे यांनी ही नोकरी स्वीकारल्याचे जाहीर केले आहे.
कोरोना महामारीमुळे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील निगडी बुद्रुक येथील साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते नवनाथ गोरे यांच्यावर लेखणीऐवजी हाती कुदळ-फावडे घेऊन शेतात मोलमजुरी करण्याची वेळ आली. प्रतिभावंत लेखक गोरे यांच्यावर आलेली परिस्थिती समोर आल्यानंतर नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठाने मदतीचा हात दिला आहे. गोरे यांच्याशी भारती विद्यापीठाचे विश्वस्त आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी फोनवरून संवाद साधला आणि मोलमजुरीची दखल घेत गोरे यांना नोकरी देऊ केली आहे. याबाबत मंत्री कदम यांनी सोशल मीडियावर माहिती दिली.
हेही वाचा - कोरोनाचा कहर: साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त 'फेसाटी'कारावर मोलमजुरीची वेळ!
मंत्री कदम यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील रहिवासी असलेल्या गोरे यांच्यासारख्या प्रतिभावान युवा लेखकाच्या बिकट परिस्थितीबाबत मला नुकतीच माहिती मिळाली. त्यानंतर जतचे आमदार विक्रम सावंत यांनीदेखील त्याबाबत माझ्याशी चर्चा केली. कोरोनासारख्या बिकट परिस्थितीत अशा होतकरू युवकांना मदतीचा हात देणे, हे माझे कर्तव्य समजतो. त्यांच्या लेखन कौशल्याला वाव मिळेल, अशी नोकरी भारती विद्यापीठात देण्याचा प्रस्ताव मी मांडला आणि आमच्या व्यवस्थापनाने तो त्वरित उचलून धरला. या संदर्भात मी स्वतः गोरे यांच्याशी संवाद साधून भारती विद्यापीठातील नोकरीबाबत माहिती दिली. त्यांनीही नोकरी स्वीकारत असल्याचे सांगितले आहे.
'बिकट परिस्थितीमुळे महाराष्ट्रात कोणत्याही क्षेत्रातील गुणवंत, रंजला-गांजला असेल तर त्याला मदतीचा हात देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कार्य स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी आयुष्यभर केले. तोच वारसा,परंपरा आम्ही पुढे चालवित आहोत. गोरे यांना भारती विद्यापीठात आम्ही हक्काची नोकरी देऊ केली आहे. शिवाय त्यांची प्रतिभावान लेखणी अविरत कार्यरत राहील, यासाठी पूर्ण संधी दिली जाईल', असेही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले आहे.
नवनाथ गोरे यांच्याविषयी -
नवनाथ गोरे यांना 2018 मध्ये त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर लिहिलेल्या 'फेसाटी' या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा 'युवा साहित्यिक' पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कारानंतर नवनाथ गोरे यांच्या आयुष्याला थोडीफार कलाटणी मिळाली. अहमदनगर जिल्ह्यामधील एका शिक्षण संस्थेत त्यांना नोकरी मिळाली. त्यामुळे त्यांच्या मागे लागलेले अठराविश्व दारिद्र्य मिटले. निगडी बुद्रुकमध्ये नवनाथ गोरे एका छोट्याशा पत्र्याच्या खोलीत राहतात. लॉकडाऊनमुळे ते गावी परतले तशी त्यांची नोकरी सुटली. लॉकडाऊनमध्ये जगण्याचा प्रश्न होता, आर्थिक स्थिती बिकट होऊ लागली, आता करायचे काय? असा प्रश्न त्यांना पडला. शेतात मजुरी करण्याशिवाय गोरे यांच्यासमोर पर्याय नव्हता, त्यामुळे त्यांनी शेताची वाट धरली.