सांगली - महापूर, अतिवृष्टीच्या संकटानंतर द्राक्षबागांवरील संकटात आणखी भर पडली आहे. मिरजच्या पूर्वभागात द्राक्षबागांवर वटवाघळांनी हल्ला चढवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भर पडली आहे.
यंदा जिल्ह्याला महापूर अतिवृष्टीने झोडपले. यामध्ये हजारो एकर द्राक्षबागा उद्धवस्त झाल्या आहेत. या संकटातूनही शेतकऱ्यांनी द्राक्षबागा जगवल्या आहेत. मात्र, आता या बागांवर वाढलेल्या वटवाघळांच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. मिरज तालुक्यातील आरग, लिंगनूर आणि बेडग गावांतील द्राक्षबागांवर गेल्या 15 दिवसांपासून रात्रीच्या वेळी वटवाघळांचे हल्ले होत आहेत. यामुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. हे हल्ले कसे रोखायचे असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.