सांगली - भर दिवसा कवठे महांकाळ शहरात माजी सरपंचाच्या भाच्याला चाकूने भोकसल्याचा घटना घडली आहे. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अमर उर्फ संतोष जयराम आटपाडकर आणि विजय माने, अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे कावठेमहांकाळ तालुका पुन्हा हादरून गेला आहे.
खुनी हल्ल्याची तालुक्यातील दुसरी घटना
तीन दिवसांपूर्वी कवठे महांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे उपसरपंच निवडीतून ग्रामपंचायत सदस्याचा खून झाल्याची घटना घडली होती. तोपर्यंत तालुक्यात अजून एक खुनी हल्ला झाला आहे. तालुक्यातील पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा असणाऱ्या अमर उर्फ संतोष जयराम आटपाडकर याच्यावर दोघा अज्ञात हल्लेखोरांनी छातीवर, पोटावर, डोक्यात तसेच शरीरावर इतर ठिकाणी वार करत भोकसल्याची घटना घडली आहे.
मित्रावरही खुनी हल्ला
कवठे महांकाळ शहरातील धुळगाव रस्त्यावरील मुख्य चौकात भर दिवसा घडलेल्या या खुनी हल्ल्यामुळे धावपळ उडाली. तर या हल्ल्यात संतोष जयराम आटपाडकर याच्या सोबत असणाऱ्या मित्रावरही हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये विजय माने सुद्धा गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर दोघा हल्लेखोरांनी पळ काढला. नंतर नागरिकांनी दोघा जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे. तर घटनेची माहिती मिळताच कवठे महांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
खुनाच्या वादातून हल्ल्याची शक्यता ?
पिंपळगावचे माजी सरपंच असलेले रमेश खोत हे अमर आटपाडकर यांचे मामा असून खोत हे तालुक्यातील हरोली येथील माजी सरपंच युवराज पाटील यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आहेत. त्या खुनाच्या वादातून हा हल्ला झाला आहे का? यादृष्टीनेही आता पोलीस तपास करत आहेत. मात्र, तालुक्यात एका मागून एक झालेल्या खुनी हल्ल्याच्या घटनांनी कवठे महांकाळ तालुका हादरून गेला आहे.
हेही वाचा - 24 तासांत लावला चोरीचा छडा, चोरीतील मुद्देमालही केला हस्तगत