सांगली - मुदतबाह्य साखरेची विक्री करण्यास मज्जाव केल्याने शिवीगाळ, करत अंगावर धावून येऊन चारचाकी गाडीची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रहार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी कुरळप पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रताप बाजीराव पाटील, रोहित प्रकाश पाटील, सुनील भीमराव गिरुलकर, कुमार शंकर पाटील, विकास सदाशिव लबडे (ऐतवडे खुर्द) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
ऐतवडे खुर्द येथील वारणा बझारमध्ये 21 ऑगस्टला कारखान्याची मुदत संपलेली साखर विक्री सुरू होती. याची माहिती मिळाल्याने प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील, संजय पाटील व कार्यकर्ते बझारमध्ये शहानिशा करण्यासाठी गेले होते. यावेळी साखरेच्या पोत्यांवर 2014, 2016, 2017 अशी मुदत संपलेली तारीख छापलेली असल्याचे दिसून आले. ही बाब गावातील दक्षता कमिटीचे तलाठी, ग्रामसेवक यांना बोलावून त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावरून तलाठी व ग्रामसेवक यांनी साखर विक्री बंद करून वारणा बझार सील केला होता. मात्र, सायंकाळी पावणेसहा वाजता वारणा बझारचे व्यवस्थापक शरद महाजन हे सील तोडून साखरेची पोती ट्रकमधून घेऊन जात असल्याचे स्वप्नील पाटील यांना समजले. ही माहिती कळताच ते आपल्या चारचाकी गाडीतून बझारजवळ पोहोचले. यावेळी प्रताप बाजीराव पाटील, रोहित प्रकाश पाटील, सुनील भीमराव गिरुलकर, कुमार शंकर पाटील, विकास सदाशिव लबडे यांनी शिवीगाळ करत गाडीवर दगड व बांबूच्या दांडक्याने हल्ला चढवत तोडफोड केली. तसेच धमकी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार स्वप्नील पाटील व संजय पाटील यांनी कुरळप पोलिसांत दिली. याप्रकरणी आज भारतीय दंड अधिनियम 143, 147, 427, 504, 506, 135 प्रमाणे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करत आहेत.