सांगली - भाजप सरकारने जाणीवपूर्वक राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार या सूतगिरण्या उर्जितावस्थेत आणेल, असा विश्वास वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केला. सांगलीच्या पलूस येथे पश्चिम महाराष्ट्रामधील सहकारी सूतगिरण्या आढावा बैठक प्रसंगी ते बोलत होते.
राज्यातील सहकारी सूतगिरण्या सध्या विविध कारणांनी अडचणीत सापडल्या आहेत. अडचणीतील गिरण्या चालवण्यासाठी अनेक गोष्टींना सूतगिरणी चालकांना सामोरे जावे लागत आहेत. या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सांगलीच्या पलूस येथे पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी सूतगिरण्या संचालकाची आढावा बैठक मंगळवारी पार पडली. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीस, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार मोहनराव कदम, सूतगिरणी चालकांचे नेते महेंद्र लाड यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सूतगिरणी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सूतगिरणी चालकांनी सरकारकडून देण्यात येणारा दुजाभाव, वीज दराचा प्रश्न आदी समस्या या बैठकीत मांडल्या. यावर बोलताना वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी केंद्रीतील भाजप आणि राज्यातील मागील भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
केंद्र सरकारच्या बजेटमध्ये वस्त्रोद्योग व्यवसायाला खूप कमी पैसे मिळले आहेत. त्यामुळे कापड उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. त्याचबरोबर राज्यातील मागील भाजप सरकारने सहकारी सूतगिरणी उद्योगाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे सूतगिरण्या या अडचणीत आल्याची टीका मंत्री शेख यांनी केली.
तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सूतगिरण्यांना ऊर्जितावस्था आणायचे असेल, तर गिरण्यांची काही जमिनी विकायचा निर्णय शासनाने घेतला पाहिजे, तरच बँकांची कर्ज देणे भागतील आणि सूतगिरण्यांना नवीन मशिनरी उपलब्ध होईल, असा विश्वास मंत्री शेख यांनी व्यक्त केला. तर पुन्हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून सूतगिरणी व्यवसायाला बळ देण्याचे काम करणार आहे, यासाठी येत्या 8 दिवसात मुंबईमध्ये बैठक घेण्यात येणार असल्याचे शेख यांनी स्पष्ट केले.