सांगली- वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी आशा वर्कर व गटप्रवर्तक महिला कर्मचारी संघटनेकडून सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
अत्यंत तुटपुंज्या मानधनात अनेक वर्षांपासून 70 हजार महिला आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी म्हणून काम करत आहेत. कोरोना काळात सुद्धा जीव धोक्यात घालून आशा वर्कर आरोग्य सेवा बजावत आहेत. मात्र, राज्य सरकारकडून या महिला कर्मचाऱ्यांबाबत अन्यायकारक भूमिका घेण्यात आली आहे. केवळ 4 हजार रुपये प्रति महिना इतके मानधन या महिलांना मिळत आहे. तटपुंज्या मानधनाच्या मोबदल्यात दुप्पट काम करून घेण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आशा वर्कर युनियन (आयटक) कडून आंदोलन करण्यात आल्याची माहिती शंकर पुजारी यांनी दिली.
हेही वाचा-गेल्या २४ तासात देशात आढळले ८६ हजार ४३२ कोरोनाबाधित; एकूण आकडा चाळीस लाखांवर
सांगली जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी जोरदार निदर्शने केली. राज्य सरकारने या महिला कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा . प्रतिमाह 18 हजार इतके वेतन द्यावे, इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे या महिला कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी आयटक संघटनेचे नेते शंकर पुजारी यांनी केली.