सांगली - जिल्ह्यातील डिग्रजजवळ ट्रक आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात घडला. यामध्ये दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. शिराळा येथे मृतदेह पोचवून रुग्णवाहिका सांगलीला परतत असताना ट्रकशी समोरुन धडक होऊन हा अपघात झाला. यामध्ये रूग्णवाहिकेचा चक्काचूर झाला आहे.
सांगली-इस्लामपूर रस्त्याचे काम सुरू असल्याने एका बाजूने वाहतूक सुरू आहे. या मार्गावर सांगलीहून इस्लामपूरकडे एक ट्रक निघाला होता. यावेळी या मार्गावरील मातोश्री गारमेंट जवळच्या गेटवर पोहचला असता, एक भरधाव रूग्णवाहिकेने समोरुन येत ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतक्या जोरात होती की रूग्णवाहिका धडकल्यानंतर बाजूच्या डिव्हायडरवर जाऊन धडकली.
या अपघातामध्ये रुग्णवाहिकेचा चालक सनी राठोड (रा. शंभरफुटी रोड, सांगली), आणि अरुण कांबळे (रा. सांगलीवाडी) हे दोघे जागीच ठार झाले. हे दोघे बत्तीस शिराळा येथे मृतदेह पोचवण्यासाठी गेले होते, आणि सांगलीकडे परतत असताना हा अपघात घडला. रुग्णवाहिका वेगात असल्याने समोरून येणार ट्रक त्यांना दिसला नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदन करण्यासाठी सांगलीच्या वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात पाठवला आहे.