सांगली - राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारित कायद्या (सीएए) विरोधात सांगलीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. संविधान सरंक्षणाची हाक देत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनीही रस्त्यावर उतरत केंद्र सरकारच्या एनआरसी आणि सीएए कायदाला विरोध दर्शवला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांसह विविध सामाजिक संघटना व नागरिकांनाही या मोर्चात सहभाग घेतला होता.
एनआरसी, सीएए आणि एनपीआर रद्द करा, या मागणीसाठी सांगली शहरातून हा मोर्चा निघाला. पुष्पराज चौक येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली. सांगली शहरातल्या प्रमुख मार्गावरून स्टेशन चौकापर्यंत हा मोर्चा निघाला.
या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस आमदार विक्रम सावंत, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चा, शेतकरी कष्ट मजूर संघटना अशा अनेक सामाजिक संघटना व विशेष करून मुस्लीम समाजातील महिला आणि तरुणांचा या मोर्चामध्ये मोठा सहभाग यावेळी दिसून आला. भाजप सरकारच्या विरोधात या मोर्चामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.