सांगली - 'ड्रोनच्या वॉच'मध्ये कुपवाडमध्ये बेकायदेशीर सुरू असलेला दारू दुकानांचा भांडाफोड झाला आहे. यासंदर्भात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून दारू दुकानांना 20 हजारांचा दंड ठोठावला आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ड्रोन तपासणीत दारू विक्रीचा भांडाफोड -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे कडक निर्बंध लावण्यात आला आहे. मात्र, अनेक ठिकाणी नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरतात. अनेक जण परवानगी नसताना दुकाने चालू ठेवतात. यावर नजर ठेवण्यासाठी कुपवाड पोलिसांच्याकडून ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. नेमक्या याच ड्रोन कॅमेरात 2 दारू दुकानाचा भांडाफोड झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने देशी दारु दुकानांच्या आस्थापना बंद करुन शासनाने दिलेल्या निर्देशानुसार घरपोच सेवा देण्याचे आदेश असताना कुपवाड शरद नगर व हनुमान नगर येथील देशी दारु दुकानांबाहेर ग्राहकांनी दारू विक्री करण्यात येत असल्याची बाब ड्रोनमध्ये कैद झाली. यानंतर ड्रोनच्या लोकेशनवर पोलिसांनी तत्काळ पोहचून दारू दुकानंदारावर कारवाई केली. यावेळी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दारू दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दौघांनाही प्रत्येकी 10 हजारांचा दंड ठोठावला आहे.
हेही वाचा - 'विरार रुग्णालय आगीसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेदनशील'