सांगली - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर 15 मे रोजी माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. 'अंगण हेच माझे आंदोलन' अशा पद्धतीने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे आणि विविध प्रश्नांवर हे आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील तमाम शेतकऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
हेही वाचा... शेतकऱ्याचा मुलगा ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी, अमोल मिटकरींना 'अशी' मिळाली संधी
कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना सर्व पातळ्यांवर मदतीचा हात देणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे. याबद्दल राज्याचे माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी माहिती दिली. येत्या 15 मे रोजी राज्यभर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'अंगण हेच माझे आंदोलन'
कोरानामुळे शेतकरी पुरता बेजार झाला आहे. त्यामुळे सध्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यचा येत आहे. यात प्रामुख्याने; शेतकऱ्यांचा साताबारा कोरा करावा, आधारभूत किंमतीने शेतीमाल खरेदी करावा किंवा प्रति क्विंटल १ हजार रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात यावे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी देण्यात यावी, दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्यावे, कोरोनामुळे फळ-भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, याच बरोबर रेशनकार्ड नसणाऱ्या कामगार, शेत मजूरांना मोफत धान्य आणि 2 हजार रुपये भत्ता देण्यात यावा, शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, असा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन असणार आहे.
तमाम शेतकरी, शेत मजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांनी या कुटुंबात सहभागी व्हावे. आपल्या कुटुंबासह अंगणातच उभे राहुन सोशल डिस्टन्सिंग पाळून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी केले आहे.