सांगली - रेशनकार्डवर मिळणाऱ्या निकृष्ट धान्याच्याविरोधात रेशनिंग कृती समितीकडून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निकृष्ट धान्य पसरवून सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
जिल्ह्यात सध्या रेशन धान्य दुकानाच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना गहू वाटप करण्यात येत आहे. मात्र, हा गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून जनावरांच्या खाण्या योग्यदेखील नसल्याचा आरोप रेशनिंग कृती समितीकडून करण्यात आला आहे. या निकृष्ट धान्य वाटपाविरोधात रेशनिंग कृती समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निकृष्ट गहू पसरवून महिलांनी जोरदार निदर्शने केली. रेशनिंग कृती समितीचे अध्यक्ष शाहीन शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन नागरिकांना स्वच्छ धान्य पुरवठा करावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.