सांगली - ब्रह्मणाळच्या महापुरात बोट बुडून 9 जणांचा मृत्यू झाला, ही घटना थरकाप उडवणारी आहे. या दुर्घटनेत वाचलेल्या आजोबांनी घटनेचे केलेले कथन, मृत्यूच्या जबड्यात ते नऊ जण कसे पोहोचले, घटनेनंतर उडालेला हाहाकार, हे मन सुन्न करणारे होते.
ब्रह्मनाळ येथील धनपाल वडेर, या वृद्ध आजोबांनी स्वतः बरोबर आणखी चौघा जणांचे प्राण वाचवले आहेत. सांगलीच्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे आज सकाळच्या सुमारास पुरात अडकलेल्या सुमारे 25 ते 30 जणांना घेऊन जाणारी बोट बुडाली. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. तर चार जण अद्याप बेपत्ता आहेत. सात महिला, दोन पुरुष आणि आपल्या आजीच्या कुशीत शेवटचा श्वास घेणारी एक दीड महिन्याची चिमुरडी, हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. या घटनेत सुमारे पंधरा ते वीस जणांचे प्राण वाचले आहेत. या दुर्घटनेतून ब्राह्मनाळ येथील धनपाल वडेर, या वृद्धाने स्वतः बरोबर हिंमतीने आणखी चौघा जणांचे प्राण वाचवले आहेत.कशी उलटली बोट...
ग्रामपंचायतीच्या या लाकडी बोटीला मागील बाजूला मोटर बसवण्यात आली होती. या बोटीत 20 ते 25 जण बसले होते. ब्रम्हणाळ येथून बोट निघाली. काही अंतर पार केल्यानंतर पाण्यात बुडालेल्या झाडाच्या फांदीला होडीच्या मोटारीची पात अडकली आणि प्रेशरमुळे मागील बाजू वर उचलली गेली. बोटीतील नागरिकांनी जिवाच्या भीतीने पाण्यात उड्या घेतल्या.